पिंपरी |लोकशक्ती|
पिंपरी-चिंचवड शहरात ‘एच३ एन२’ विषाणूमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ‘एच३ एन२’मुळे शहरातील मृतांची संख्या दोन झाली आहे. शहरात एक जानेवारीपासून ‘एच ३ एन २’ बाधित १७ रुग्ण आढळले. त्यापैकी १५ रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. १६ मार्च रोजी भोसरीतील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता.
शहरातील गेल्या पंधरा दिवसात दोन हजार २६२ जणांनी करोनाची चाचणी केली. त्यापैकी २५५ जणांचे अहवाल सकारात्मक आले. या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे होती. त्यामुळे घरीच उपचार घेवून बरे होत आहे. पाच दिवसांच्या उपचारानंतर रुग्ण करोनामुक्त होत आहेत. आजपर्यंत १३६ जण करोनामुक्त झाले. सद्यस्थितीत शहरात ११९ सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील केवळ तीन रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित सर्व रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ आहे. रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. सद्यस्थितीत तीन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा.
डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी