– जप्ती पुर्व नोटीस एकाची, मिळकत सील केली दुस-यांचीच
– महापालिकेचे बिगरनिवासी मिळकत जप्तीचे नियम बसविले ढाब्यावर..
पिंपरी |लोकशक्ती|
महापालिकेच्या करसंकलन चिखली विभागीय कार्यालयातील प्रभारी सहायक मंडलाधिका-याने मनमानी कारभार सुरु केला आहे. करसंकलन वसुली प्रमुखाचे आदेश फाट्यावर मारत आणि महापालिका अधिनियमातील मिळकत जप्तीचे नियम ढाब्यावर बसवत सर्रासपणे जप्तीचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे बिगरनिवासी मिळकत जप्तीसाठी प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या अनुउपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. मात्र, प्रभारी सहायक मंडलाधिकारी व लिपिकाने बिगरनिवासी मिळकत जप्ती पुर्वीची नोटीस दिली एकाला अन्ं जप्तीची कारवाई करताना मिळकत सील केली दुस-यांचीच, असा प्रकार जाधववाडी (चिखली) घडला आहे.
करसंकलन चिखली विभागीय कार्यालयाने 31 मार्च अखेर मिळकत कर वसुली मोहीम सुरु आहे. मिळकत कर वसुलीसाठी जाधववाडीतील सर्व्हे नंबर 671 मधील गट क्रमांक 6 मध्ये मालमत्ता क्रमांक 1130603515/00 मधील शरीफभाई चौधरी, इमरान मोहम्मद अलम खान आणि शफिदा शकील खान यांच्या बिगरनिवासी मिळकतीच्या थकबाकीपोटी जप्ती पुर्वीची नोटीस बजाविण्यात आली. या नोटीसीत संबंधित बिगरनिवासी मिळकतीची सुमारे 62 लाख 40 हजार 186 रुपये थकबाकी असल्याचे दिसत आहे. सदरील नोटीस प्रभारी सहायक मंडलाधिकारी संजय लांडगे आणि लिपिक शंकर कानडी यांनी दिली आहे.
जाधववाडीत जप्ती पुर्व नोटीस देवूनही बिगरनिवासी मिळकतीची थकबाकी न भरल्याने सर्व्हे नंबर 671 मध्ये सदरील मिळकत सील करण्यासाठी सहायक मंडलाधिकारी, लिपिक, सुरक्षारक्षकाचे पथक गेले होते. त्यावेळी संबंधित प्रभारी सहायक मंडलाधिकारी व लिपिकाने सर्व्हे नंबर 670 मधील बिगरनिवासी मिळकत सील केली आहे. ही मिळकत सील करताना कुठलेही व्हिडिओ शुटींग केलेले नाही. सदरील मिळकत मालकाला कोणतीही नोटीस दिलेली नाही. त्या मिळकतीचा एक रुपया देखील थकबाकी नसताना सर्व्हे नंबर 670 मध्ये बिगरनिवासी मिळकत सील करण्यात आली. मिळकत सील केल्याने मागील आठ दिवसात संबंधित मालकाचे आर्थिक नूकसान झाले आहे.
दरम्यान, चिखलीचे प्रभारी सहायक मंडलाधिकारी, गट क्रमांक 6 चे लिपिक यांनी मनमानी करत सर्व्हे नंबर 670 मधील बिगरनिवासी मिळकत सील केलेली आहे. मुळात बिगरनिवासी मिळकत सील करताना सक्षम प्राधिकरण अधिकारी म्हणून प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या उपस्थितीत कारवाई होणे आवश्यक आहे. परंतू, त्यांना कुठलाही पुर्व कल्पना न देता ही कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित वसुली प्रमुखाकडून जप्ती अटकाव (वाॅरट) ह पत्र दिलेले नसताना ही बिगर निवासी मिळकत सील केलेली आहे. त्यामुळे सदर मिळकत मालकाकडे कुठलीही थकबाकी नसताना त्यांची मिळकत सील करुन त्याचे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे. याबाबत सहायक मंडलाधिकारी व लिपिक यांच्या विरोधात आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.
माझी बिगर निवासी मिळकतीचा सर्व्हे नंबर 670 आहे. त्यांनी सर्व्हे नंबर 671 ची नोटीस मला देण्यास आले आहेत. मला थकबाकीची नोटीस दिली नाही. जप्ती पुर्व नोटीस नाही. तरीही चिखलीतील करसंकलन अधिका-यांनी माझी मिळकत सील केलेली आहे.
शरीफुल्लाह चौधरी, तक्रारदार
सदरील बिगरनिवासी मिळकत सीलची कारवाई करताना मला कुठलीही पुर्वकल्पना दिलेली नाही. मी त्या ठिकाणी उपस्थितीत नव्हतो. या बिगर निवासी कारवाई बाबत आमच्या कर्मचा-यांकडून माहिती घेवून सांगतो.
नाना मोरे प्रशासन अधिकारी, चिखली