पिंपरी |लोकशक्ती|
पिंपरी चिंचवड शहरात फिरत्या व पथविक्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने शहरातील पथ विक्रेत्यांचे एक नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. त्यापासून कोणाही वंचित राहू नये, यासाठी दोन वेळ मुदतवाढ दिली होती. आतापर्यंत १८ हजार ६०३ पथ विक्रेत्यांची नोंद झालेली असून, ते व्यवसाय करताना समक्ष जागेवर आढळले आहेत. त्यांची यादी शुक्रवारी (दि. ३१) महापालिका प्रसिद्ध करणार आहे.
या सर्वेक्षणात सहभागी पथ विक्रेत्यांची प्राथमिक यादी ३१ मार्च रोजी सर्व क्षेत्रीय कार्यालय व भूमी जिंदगी विभागात (दुसरा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, महापालिका, पिंपरी) येथे प्रसिद्ध केली जाईल. तसेच, महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
दोन मेपर्यंत मुदत
सर्वेक्षणानंतर जाहीर केलेल्या पथविक्रेत्यांच्या यादीत नाव नसल्यास ते समाविष्ट करण्यासाठी, सर्वेक्षण करून घेण्यासाठी दोनपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत संबंधितांनी कागदपत्रांची पूर्तता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये करावी. मुदतीनंतर प्राप्त हरकतींचा, अर्जांचा कोणताही विचार केला जाणार नाही. यादीत नाव आहे पण कागदपत्र दिलेली नाहीत, त्यांनी कागदपत्र सादर करावीत. कागदपत्रे सादर करेपर्यंत संबंधितांची नोंदणी स्थगित ठेवण्यात येईल, असे भूमी-जिंदगी विभागाने कळविले आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथविक्रेते
कार्यालय / पथविक्रेते
अ / ४,४१९
ब / १,९३९
क / २,४४०
ड / १,१२०
इ / १,८३२
फ / २,९४८
ग / १,६६२
ह / २,२४३