हाती आलेल्या निकालानुसार विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) निकालानंतर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्याचे समोर आले आहे. या पराभवानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन समोर आलेला निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आज टोमणा मारणार नाही. पण आत्ता तरी अस्सल भाजपाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. महायुतीचा विजय झाला हे आता जाहीर झालेले आहेच. मी त्यांचे अभिनंदन न करण्याइतका कद्रूपणा दाखविणार नाही, मी त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा 2024 निकाल लागत आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतदान विधानसभा निवडणुकीत झाले. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. मात्र महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असून २०० हून अधिक जागांवर विजय मिळविल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महायुतीकडे बहुमताच्या पलीकडे जागा आल्याने लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. लवकरच संपूर्ण जागांचा निकाल जाहीर होईल, त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.