पिंपरी |लोकशक्ती|
मोशीतील कचरा डेपोला आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. आग लागण्याचे कारण नैसर्गिक आहे की हेतुपुरस्सर आग लावण्याचा मानव निर्मित प्रयत्न होत आहे? याची चौकशी करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी द्विसदस्यीय समिती गठीत केली आहे. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता राजन पाटील या दोघांच्या समितीने सखोल चौकशी करावी. 30 दिवसांच्या आत अहवाल गोपनीय स्वरुपात सादर करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
मोशी येथे महापालिकेचा कचरा डेपो आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा संकलन करून मोशीत डम्पिंग केला जातो. कचरा डेपोतील सॅनिटरी लॅन्डफिलवर 6 एप्रिल रोजी आग लागल्याची धक्कादायक घटनी झाली. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन आग नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तसेच 16 एप्रिल रोजी पुन्हा मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंगचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आग लागली.
तक्रार अर्जातील उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी करणे, कचरा डेपोला लागलेल्या आगीची कारणे काय आहेत, आग कोणाच्या चुकीमुळे लागलेली आहे, या घटनेला अधिकारी, कर्मचारी जबाबदार कोण, आगीची घटना टाळता आली असती काय, वारंवार आग लागल्यामुळे महापालिकेच्या झालेल्या नुकसानीची परिगणना करणे, झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करणे, अशा प्रकारे आग लागण्याबाबतच्या भविष्यात घटना उद्भवू नयेत याबाबत करावयाच्या उपाययोजना सुचविणे, आगीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि शहर अभियंता राजन पाटील यांची द्विसदस्यीय समिती गठीत करण्यात आली.