- मालमत्ता विवरण सादर करण्यास चालढकल
- महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संपत्ती जाहीर न करण्यामागे दडलंय काय?
|विकास शिंदे|
पिंपरी |लोकशक्ती|
“श्रीमंत’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी मालामाल आहेत. अधिकाऱ्यांना दरवर्षी स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण पत्र महापालिकेला सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेतील तब्बल 933 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःची व कुटूंबियांची मालकी असलेली स्थावर व जंगम मालमत्ता दडविली आहे. त्यामुळे ही माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या वर्ग 1 ते 3 मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण मालमत्ता किती? याचा अंदाज महापालिका भवनासमोर लावलेल्या महागड्या गाड्यांवरुनच सर्वसामान्य बांधत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. या ठिकाणी बदली करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच लागलेली असते. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अनेक अधिका-यांचा कार्यकाळ पुर्ण झाला. तरीही ते महापालिका सोडून जाण्यास तयार नसतात. त्याचबरोबर महापालिकेतील विभाग प्रमुख, वर्ग 2 व 3 अधिकारी बदली केल्यास देखील लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप करुन पुर्वीच्याच ठिकाणी नियुक्ती करावी, असा हट्ट करत असतात. त्यामुळे स्थापत्य, बांधकाम, नगररचना, प्रशासन, आरोग्य, वैद्यकीय, पाणी पुरवठा, शिक्षण, विद्युत, पर्यावरण आदी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले दिसून येतात. त्यांनी राजकीय नेत्यांच्या आश्रयाला जाऊन “तुम्ही पण जगा अन् आम्हालाही जगू द्या’, असा पवित्रा घेतलेला दिसत आहे.
महापालिका आस्थापनेवर काम करणाऱ्या वर्ग 1 ते 3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरणपत्र दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार 2 हजार 648 अधिकारी व कर्मचाऱ्यांना मालमत्ता माहितीचे विवरणपत्र प्रशासन विभागाकडे तर वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचे विवरणपत्र त्या-त्या विभागाच्या विभाग प्रमुखांकडे सादर करावे लागते. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत “झोपेचे सोंग’ घेतले आहे. 31 मे 2022 अखेर मालमत्ता विवरणपत्र सादर करणे बंधनकारक असताना देखील अद्याप वर्ग एक ते तीन तब्बल 933 अधिकारी व कर्मचा-यांनी विवरणपत्र सादर केलेले नाही.
महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उद्योग, व्यवसाय आहेत. स्थापत्य विभागात काहींनी कुटुंबियांच्या नावावर कंत्राटे घेतली आहेत. काही अधिकाऱ्यांचा वाहन, घरे व इतर डामडौल पाहता त्यांच्या “श्रीमंती’चा अंदाज येईल. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचे वाढदिवस, लग्न सोहळे एखाद्या राजकीय पुढाऱ्याला लाजवेल असे आहेत. मागील दोन वर्षांपासून अनेकांनी मालमत्ता विवरणपत्र सादर केले नसल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासन विभागाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने ते गांभीर्याने घेत नसल्याची चर्चा आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असताना प्रशासन विभागाने बोटचेपी भूमिका घेतली आहे.
मालमत्ता विवरण सादर न केलेले अधिकारी
तपशील वर्ग 1 वर्ग 2 वर्ग 3
सादर केलेले 47 112 1576
सादर न केलेले 105 95 733
एकूण 152 187 2309