आकुर्डी |लोकशक्ती|
आकुर्डी (Akurdi) येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या अभियांत्रिकीच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 8 मे) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. कृष्णा क्षीरसागर (वय 19, रा. बॉईज हॉस्टेल, निगडी. मूळ रा. नांदेड) असे जलतरण तलावात बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा आकुर्डी (Akurdi) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी तो त्याच्या मित्रांसोबत आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी गेला. जलतरण तलावात पोहत असताना बराच वेळ झाला तरी कृष्णा पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला आणि त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच कृष्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या विषयी निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.