पिंपरी |लोकशक्ती|
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या दोन उपायुक्तांना अखेर विभागाचे कामकाज वाटून दिले आहे. मात्र, उपायुक्त संदीप खोत यांचा आरोग्य आणि निलेश देशमुख यांचा पशुवैद्यकीय विभाग काढून घेत कामकाजाचे फेरवाटप केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 31 मार्च 2022 रोजी शासनाच्या नगरविकास विभागाने उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, विठ्ठल जोशी यांची प्रतिनियुक्तीने बदली झाली होती. ढोले, जोशी 4 एप्रिल रोजी महापालिकेत रुजू झाले. मात्र, त्यांना रुजू होऊन एक महिना झाला तरी कामकाज दिले नव्हते. अखेरीस महिन्याभरानंतर आयुक्तांनी उपायुक्तांना काम दिले आहे.
उपायुक्त ढोले यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन विषयक कामकाज आणि पशुवैद्यकीय विभाग तर उपायुक्त जोशी यांच्याकडे दक्षता व गुण नियंत्रण, माहिती व तंत्रज्ञान विभाग, नागरी सुविधा केंद्राचा कार्यभार दिला आहे. तर, जलपर्णीच्या निविदेच्या मुदतवाढीमुळे वादात सापडलेले उपायुक्त संदीप खोत यांच्याकडील आरोग्य विभाग काढून घेतला आहे.
त्याचबरोबर तीन सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. यामध्ये सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांच्याकडील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार काढून माहिती व जनसंपर्क, स्वच्छ सर्वेक्षण कामकाज समन्वयक हा पदभार दिला आहे. विनोद जळक यांच्याकडून स्वच्छ सर्वेक्षण कामकाज समन्वयक काढून ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार दिला आहे. सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे यांच्याकडील जनसंपर्क विभाग काढून त्यांच्याकडे आता प्रशासन विभागाचे कामकाज कायम ठेवले आहे.